मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रात अनलॉक करण्याच्या निर्णयावरून गेल्या दोन दिवसांत प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. राज्य सरकारच्या या गोंधळात जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला. लॉकडाऊन की अनलॉक यावरुन अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते.
अखेर शुक्रवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून अनलॉकच्या संदर्भातील अधिसूचना जाहीर केली. मात्र, हा गोंधळ का निर्माण झाला? यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. लोकसत्ता वृत्तपत्राकडून आयोजित करण्यात आलेल्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी यावर भाष्य करत स्पष्टीकरण दिलं आहे.
संभ्रम कशामुळे झाला?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य आपत्ती विभागाची बैठक होती. बैठकीत दोन मुद्दे होते, एक म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षेंचं काय करायचं, या संदर्भात निर्णय झाला आणि शिक्कामोर्तब झालं. दुसरं म्हणजे निकष ठरवले पाहिजेत अशी सूचना मांडण्यात आली. त्याच दरम्यान विजय वडेट्टीवार यांचा गैरसमज झाला की, निकष ठरवून आपण जाहीर करत आहोत. त्यानुसार त्यांनी ते जाहीर केलं, त्याच्यात त्यांची काहीही चूक नव्हती.
मुद्दा इतकाच होता की, मी प्रशासनाला सांगत होतो की यावर एक-दोन दिवस आढावा घ्या काय-काय होऊ शकतं. त्यावर निकष ठरवता येतील. त्याप्रमाणे परवा जे निकष होते तेच जाहीर करण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
सरकारच्या प्रतिमेला तढा नाही जात का?
विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलेल्या सूचनांमध्ये जर बदल झाले असते तर गडबड होती. सर्वांचं निकषांबाबत एकमत झालं. येत्या दोन-पाच दिवसांत टास्कफोर्सने जर काही सूचना केल्या तर त्यानुसारही बदल होतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.