कोर्टाचा कठोर आदेश : तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, आंदोलक ठाम – “गोळ्या झाडल्या तरी हटणार नाही”!

मुंबई | दि. २ सप्टेंबर २०२५ : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

शहरातील अस्थिर वातावरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायालयाने राज्य सरकारला थेट इशारा दिला – “आज दुपारी तीन वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आणा, अन्यथा कोर्टाचा अवमान मानून कठोर कारवाई केली जाईल.” पुढील सुनावणी आज दुपारीच होणार असून, त्याआधी सरकारने सर्व काही सुरळीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या मराठा आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. “आरक्षण मिळेपर्यंत इथून हलणार नाही. आम्हाला गोळ्या झाडल्या तरीही जागा सोडणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

न्यायालयातील महत्त्वाचे मुद्दे

  1. दुपारी तीनपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करण्याचे आदेश सरकार व आंदोलकांना.
  2. सरकारच्या भूमिकेबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली.
  3. आंदोलनकर्त्यांनी कोर्टाला घेराव घालणे चुकीचे असल्याचे निरीक्षण.
  4. परवानगीशिवाय आझाद मैदानात ठिय्या मांडणे अनुचित; जागा रिकामी करण्याचे निर्देश.
  5. कार्यवाही न झाल्यास न्यायालय स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करणार.

आंदोलकांची भूमिका

  • “जर कुणाला त्रास झाला असेल तर आम्ही माफी मागतो, मात्र आमच्यासाठी कुठलीही सोय करण्यात आलेली नाही.”
  • “५ हजार जणांना परवानगी दिली, पण ५०० लोकांसाठीसुद्धा पार्किंगची सोय नाही.”
  • “आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत आणि कायद्याचे पालन करीत आहोत.”

कोर्टाचे सरकारला आदेश

  • दुपारी तीनपर्यंत दक्षिण मुंबई रिकामी करा, व्यवस्था सुरळीत करा.
  • अन्यथा कोर्ट स्वतः परिस्थितीचा आढावा घेईल.
  • आदेशाचे उल्लंघन झाल्यास अवमान कारवाई होईल.
  • नागरिकांना भीतीमुक्त वातावरण मिळावे; स्थानिकांना शांततेत राहू द्या.

आंदोलक ठाम

मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांचा पवित्रा अधिक आक्रमक झाला आहे. “आरक्षणाशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. कितीही दिवस लागले तरी आमचे दादा इथे आहेत तोपर्यंत आम्हीही इथून हलणार नाही,” असा संदेश आंदोलकांनी दिला आहे.

Loading