महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द झाला आहे. शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. साईमंदिराचे राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहे. आता 8 आठवड्यांमध्ये नवे विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागणार आहे.
शिर्डीतील राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीसाठी शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केलेली होती. आज या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला.
आघाडी सरकारने साई संस्थानमध्ये विश्वस्त मंडळ स्थापन केले होते. विश्वस्तपदांसह अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणि विश्वस्त काँग्रेसचे वाटप असे झाले होते. आघाडी सरकारने 16 सदस्यांची केली नेमणूक केली होती. पण साईसंस्थानच्या घटनेनुसार या मंडळाची नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
अखेर औरंगाबाद खंडपीठाने महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेले हे राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त केले आहे. पुढील आठ आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला नव्याने विश्वस्त मंडळ नेमावे लागणार आहे. नविन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साईमंदिराचा कारभार पाहणार आहे.