मागच्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते मात्र काही दिवसांनंतर पावसाने उसंत घेतल्याने दिलासा मिळाला होता. परंतु सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
त्यामुळे पावसाचा परतीचा प्रवास लांबणार असून आगामी चार दिवस कोकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, पुणे परिसरातही पावसाचा जोर वाढणार आहे.
मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, आगामी दोन दिवस हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टी भागात पावासाचा इशारा दिला आहे.
संपूर्ण कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मात्र आगामी दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असून रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याशी शक्यता वर्तविली आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, महाड, कोकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार:
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यात आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्यात मॉन्सून अधिक सक्रिय राहणार आहे. सप्टेंबरमध्ये जवळपास 109 टक्के हवामानाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जुलै तसेच ऑगस्टमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली होती. जुलैमधील पावसानंतर तर पुणे जिल्ह्यातील धरणे फुल्ल झाली होती.
आता हंगामातील अखेरच्या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या मध्यानंतर वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले, की सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.