”राणेंचं वाक्य चुकलं नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद”; भाजप
मुंबई (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटला आहे. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसैनिक भलतेच संतापले. त्यानंतर भाजपही राणेंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नारायण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
नारायण राणेंचं वाक्य चुकलं नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद, असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. इतकंच काय तर काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं, असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे, सामनाला किंमत देत नाही. कायदा सुव्यवस्था प्रश्न बरा आमच्या वेळीच निर्माण होतो, असं पाटील म्हणालेत.
काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झालं. आता राणेंना मोकळीक दिली, जामीन दिला. एसपीकडे दोनदा हजेरी लावण्यास सांगितलं. त्यांना नोटीस दिली आणि बोलताना सांभाळून बोललं पाहिजे असं सांगितलं. सत्याचा विजय झाला आहे. राज्य सरकार सारखे कोर्टाच्या थपडा खात आहे. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, राणेंची तब्येत खराब झालीय. जेवताना ताट हिसकावून घेतलं हे अमानवीय आहे. पोलीस स्टेशनध्ये बसून ठेवलं. त्यामुळे एक दिवस आराम करतील. लवकरच जनाशीर्वाद यात्रा निघेल. राणेंना मुंबईत प्रतिसाद मिळाला, मुंबई हरली तर? मुंबईत पोपटाचा प्राण आहे. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
सगळं ड्राफ्टिंग झालंय. लवकरच परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी क्लिप राज्याने पाहिली आहे, असंही ते म्हणालेत.