नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक, गाड्यांची वाहतूक ठप्प; राजधानीसह अनेक गाड्यांच्या मार्गात बदल
वृत्तसंस्था: एक मोठी बातमी समोर आली आहे.
झारखंडमधील गिरिडीहजवळ मध्यरात्री नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट केला आहे.
या बॉम्बस्फोटात नक्षलवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडवून दिला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावर गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही गाड्या मार्ग बदलून वेगळ्या मार्गावरुन सुरु आहेत.
पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलमन गौरव राज आणि रोहित कुमार सिंह यांनी चिचकीच्या स्टेशन मास्टरला रात्री 00.34 वाजता धनबाद विभागातील करमाबाद-चिचकी स्टेशन दरम्यान स्फोट झाल्याची माहिती दिली. माहितीनंतर, हावडा-दिल्ली रेल्वे मार्गाच्या गोमो-गया (GC) रेल्वे विभागावरील इनकमिंग आणि आउटगोइंग लाइनवरील ऑपरेशन्स सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्या आहेत.
स्फोटामुळे हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. या स्फोटानंतर रेल्वेकडून खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा या लाईनमध्ये स्फोट झाला. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात रेल्वेगाडीचे कोणतेही मोठे नुकसान झाले नसून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरून अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
रद्द केलेली ट्रेन: 13305 धनबाद – देहरी ऑन सोन एक्सप्रेस 27.01. 2022 रोजी रद्द केली आहे.
या गाड्या थांबल्या:
13329 धनबाद – पाटणा एक्स्प्रेस चौधरीबंध येथे 00.35 वाजता थांबली आहे.
18624 हटिया-इस्लामपूर एक्स्प्रेस पारसनाथ येथे 00.37 वाजता थांबली आहे.
18609 रांची – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पारसनाथ येथे 00.55 वाजता थांबली आहे.
दरम्यान नक्षलवाद्यांनी आज 27 जानेवारीला झारखंडमध्ये बंदची हाक दिली आहे. काही काळापूर्वी सीपीआय माओवादी नक्षलवादी संघटनेचे सर्वोच्च नेते प्रशांत बोस आणि त्यांची पत्नी शीला दी नावाच्या दोन बड्या नक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर नक्षलवाद्यांनी 27 जानेवारीला बिहार-झारखंड बंदची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, आरपीएफसह झारखंडच्या स्थानिक पोलिसांना आज विशेष सतर्क करण्यात आले आहे.