Weather Update News: देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण जाणवत आहे. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठला आहे.
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तर भारतात पारा घसरला, सफदरगंजमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद :
देशातील अनेक भागात तापमानाचा (Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी (10 जानेवारी) थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सफदरगंजमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. सफदरगंजमध्ये 1.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून या मोसमातील सर्वात कमी तापमान आहे. राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुढील दोन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता:
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.