नंदूरबार (प्रतिनिधी): पहिल्या पत्नीला घराबाहेर काढण्यासाठी नंदूरबार येथील एका तरुणाने आपल्या दुसऱ्या पत्नीची मदत घेत पहिल्या पत्नीवर क्रूरतेच्या परिसीमा गाठल्या आहेत.
आरोपींनी फिर्यादी महिलेला घराबाहेर काढण्यासाठी चक्क तिला शॉक लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
या दुर्दैवी घटनेत उपचारानंतर बऱ्या झालेल्या महिलेनं तळोदा पोलीस ठाण्यात जावून आपबीती सांगितली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या नवऱ्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
लक्ष्मी पटले असं फिर्यादी महिलेचं नाव आहे. तर सासरा जयसिंग खर्डे, नवरा मुकेश जयसिंग खर्डे आणि त्याची दुसरी पत्नी गीता असं गुन्हा दाखल झालेल्या तिन्ही आरोपींची नावं आहे. फिर्यादी लक्ष्मी यांचा काही वर्षांपूर्वी मालदा येथील रहिवासी असणाऱ्या मुकेश जयसिंग खर्डे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच त्याच्यांत खटके उडू लागले. कौटुंबीक वादानंतर फिर्यादी महिला रागाच्या भरात आपल्या माहेरी आल्या होत्या.
दरम्यान, आरोपी मुकेश याने गीता नावाच्या अन्य एका महिलेसोबत दुसरा विवाह केला. पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच, लक्ष्मी पुन्हा आपल्या सासरी आल्या. यामुळे मुकेश आणि लक्ष्मी यांच्यात वादाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत हा वाद सुरू होता. दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी फिर्यादी लक्ष्मी यांनी घरातून निघून जावे म्हणून, आरोपी मुकेश याने आपली दुसरी पत्नी गीताच्या मदतीने फिर्यातीला विजेचा शॉक दिला आहे. या अमानुष घटनेत फिर्यादी लक्ष्मी पटले जखमी झाल्या होता.
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर, लक्ष्मी पटले यांनी तळोदा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी पतीसह सासरा आणि नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात कौटुंबीक अत्याचारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास तळोदा पोलीस करत आहेत.