राज्यातून पावसाची एक्झिट कधी? आता दिवाळी पण पाण्यात जाणार का? हवामान खात्याने सांगितली तारीख

ऑक्टोबर महिन्या मध्यावर आला पण अजूनही पावसाने आपला मुक्काम हलवलेला नाही. मागील तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास शुक्रवारपासून सुरू झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली. या काळामध्ये गडगडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.

राज्याच्या अनेक भागात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातून २० ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल. तर दिवाळीदरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल.

दरम्यान, परतीच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, मूग, यासह भाजीपाला आणि द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये. राज्य शासनाने आतापर्यंत जवळपास 6 हजार कोटी रुपयांची मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केल्याची माहितीही सत्तार यांनी दिली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय पाहणी दौरा करणार असल्याचंही सत्तारांनी सांगितलं.