महत्त्वाची बातमी! वाहनांच्या क्रमांकात होणार मोठा बदल
वाहनांच्या सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात नवीन नोंदणी चिन्ह (new registration mark) जाहीर करण्यात आले आहे.
याचा अर्थ यापुढे वाहनांना भारत सिरिज (BH-series) म्हणजे वाहनांच्या क्रमांकाआधी BH असे लिहिलेले असणार आहे. याआधी वाहनांच्या क्रमांकाच्या आधी राज्याचे चिन्ह लिहिलेले असायचे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील गाडी असल्यास त्यावर MH असं लिहिलेलं असायचं. पण, आता BH असे लिहिलेली काही वाहने आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळू शकतात.
BH-series असलेल्या वाहनांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. देशभरात प्रवास करणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारच्या या नियमांमुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या वाहनांच्या मालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांना विनाकारण होणाऱ्या चौकशीपासून वाचता येणार आहे. सध्याच्या वाहनांना ही सुविधा उपलब्ध नाही. नवीन वाहनांना BH-series मिळवता येणार आहे.