पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज काय? 

महाराष्ट्रात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Rain Updates : उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं पावसाची शक्यता:
उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुरुवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

Cold Weather: थंडीचा जोर पुन्हा वाढण्याचा इशारा:
29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गुरुवारी (26 जानेवारी) वर्तवला होता. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे. अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होत.  पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना फटका:
राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

Loading