नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याच्या बातम्यांवर RBI ची महत्वाची माहिती

नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याच्या बातम्यांवर RBI ची महत्वाची माहिती

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटेवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये दाखवल्या जात आहे.

मात्र, या बातम्या खोट्या असून असा कोणताही विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत नसल्याची माहिती मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिली आहे.

आरबीआयने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.

त्यात म्हटलंय, की “प्रसारमाध्यमांच्या काही विभागांमध्ये अशा बातम्या येत आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्याच्या चलनात आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचा चेहरा बदलून इतरांच्या चेहऱ्यावर बदल करण्याचा विचार करत आहे. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी”.

कोणत्या बातम्या होतायेत व्हायरल:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पहिल्यांदाच नोटेवरील फोटो बदलण्याचा विचार करत आहे. रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा महात्मा गांधींसोबतचा फोटो भारतीय चलनावर विचारात घेतला जात आहे. आतापर्यंत नोटांवर फक्त महात्मा गांधींचा फोटो दिसत होता, मात्र आता महात्मा गांधींसोबत रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांचाही फोटो नोटांवर दिसू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काही सीरिजच्या नोटांवर टागोर आणि कलाम यांचा फोटो वापरण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

आयआयटीचे प्राध्यापक दिलीप शहानी यांना नमुने पाठवले:
कथित बातम्यांनुसार, गांधी, टागोर आणि कलाम यांच्या वॉटरमार्क केलेल्या छायाचित्रांचे दोन वेगवेगळे नमुने आयआयटी दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना वित्त मंत्रालय आणि आरबीआय अंतर्गत सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पाठवण्यात आले आहेत. प्राध्यापक शहानी यांना दोनपैकी एक संच निवडून सरकारसमोर मांडण्यास सांगितले आहे. त्याचा अंतिम निर्णय उच्चस्तरीय बैठकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.