दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या तरुणाचा असा झाला प्रवास, महत्त्वाची माहिती आली समोर
मुंबई (प्रतिनिधी): दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.
या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले गेले आहेत. त्याला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीमुळे केडीएमसी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
त्यातही समाधानाची बाब म्हणजे या वक्तीच्या कुटुंबातील ६ जणांपैकी ५ जणांचे कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर बाधित तरुणाचे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवले असून त्याचा अहवाल येण्यासाठी आठवडा लागणार असल्याची महिती केडीएमसी साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.
असा झाला या तरुणाचा प्रवास:
या डोंबिवलीकर प्रवाशाने केपटाऊन येथून दुबई, दुबईवरुन दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला. मुंबईत आल्यानंतर हा तरुण ओला कॅबने डोंबिवलीत आला. ओला चालकाची सर्व माहिती केडीएमसीकडून मुंबईतील आरोग्य विभागाला कळवण्यात आली आहे.
तरुणाला येऊ लागला ताप:
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून 24 नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती. यामुळे त्याचे कुटुंबीय नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरनात राहत होता. प्रवाशाला ताप येऊ लागल्याने त्याची कोरोना टेस्ट केली. कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने लॅब कडून याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली.
या रुग्णाला पालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याचे टेस्टचे नमुने उद्या जिनोम सिक्वेन्सीग साठी मुंबई येथे प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाची प्रकृती व्यवस्थीत असल्याचे डॉ पानपाटील यांनी सांगितलं.