Whatsapp, Faceboook, Twitter आणि Instagram हे प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहेत. मतं व्यक्त करणं, माहिती देणं, वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी शेअर करणं, उत्पन्न मिळवणं, जाहिराती करणं, तसंच मित्र, कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहण्यासाठी या प्लॅटफॉर्म्सचा प्राधान्यानं वापर होतो.
महाराष्ट्र एक्सप्रेसला तुमच्या बातम्या देण्यासाठी इथे क्लिक करा
यातल्या इन्स्टाग्रामला तरुणाईची विशेष पसंती मिळताना दिसते. इन्स्टाग्रामवरून युझर्स प्रामुख्यानं रील्सम्हणजेच शॉर्ट व्हिडिओ शेअर करतात. हे व्हिडिओ प्रामुख्याने मनोरंजन करणारे, एखाद्या गोष्टीची माहिती देणारे असतात. या माध्यमातून कंटेट क्रिएटर्स, एन्फ्लुएन्सर्स कमाईदेखील करतात. सध्या इन्स्टाग्राम विनाशुल्क वापरता येत असलं तरी लवकरच त्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण इन्स्टाग्राम नव्या सब्सक्रिप्शन फीचरवर (Subscription Feature) काम करत आहे. याबाबतचं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पसंती असलेल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटसाठी आता युझर्सना पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्राम आता नव्या सब्सक्रिप्शन फीचरवर काम करत असून, त्यानुसार कंटेट अॅक्सेस करण्यासाठी युझर्सना दरमहा 89 रुपये द्यावे लागणार आहेत. याचा इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि एन्फ्लुएन्सर्सना फायदा होईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. अद्याप कंपनीनं या पेड फीचरचं अधिकृत धोरण जाहीर केलेलं नाही.
सब्सक्रिप्शन घेतल्यानंतरच इन्स्टाग्राम युझर्स त्यांच्या आवडीच्या क्रिएटर्सचा कंटेट पाहू शकणार आहेत. जो इन्स्टाग्राम युजर 89 रुपये देऊन सब्सक्रिप्शन घेईल त्याला एक बॅच (Batch) देण्यात येईल. त्यानंतर युझरने काही कमेंट किंवा मेसेज केला तर त्याच्या युजरनेमसमोर हा बॅच दिसणार आहे. या माध्यमातून युझरला `सब्सक्रिप्शन घेतलेला युझर्स` अशी ओळख मिळणार आहे. सब्सक्रिप्शननंतर क्रिएटर्सना मिळणारं उत्पन्न आणि मेंबरशिप संपण्याविषयीचा तपशीलपण दिसणार आहे.
`टेक क्रंच`च्या एका वृत्तानुसार, इन्स्टाग्राम सब्सक्रिप्शन इन-अॅप पर्चेसअंतर्गत अॅपल अॅप स्टोअरच्या (Apple App Store) यादीत समाविष्ट आहे. यासाठी इन्स्टाग्राम सब्सक्रिप्शन कॅटेगरीही तयार करण्यात आली आहे. सध्या तरी तेथे 89 रुपये प्रतिमहिना चार्ज दर्शवण्यात येत आहे. युझर्ससाठी हे सब्सक्रिप्शन लागू झाल्यावर त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.