आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच हा प्रयोग झाला असल्याचे पाटील म्हणाले. शिंदे सरकारनं जर हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती, असेही गुलबाराव पाटील म्हणाले.

आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही मूळ शिवसेनेत:
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, पक्ष सोडणे गैर नाही. परंतू, ज्या घरात वाढले ज्या घराने ओळख दिली त्यांच्यासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे. आम्ही मूळ शिवसेनेत आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का? आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळालं आहे. आम्ही पक्षांतर केलेलं नाही. जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचं वक्तव्य असेल असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

सरकार कोसळण्याच्या राष्ट्रवादीच्या दाव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया:
सध्या शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर सुरु आहे. या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. या विषयी देखील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आलं. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे अधिवेशन संपलं आहे, पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा तसेच आमदारांमध्ये फूट पडू नये, म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे सांगितलं जात असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केलं. आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News