आदित्य ठाकरेंचा उद्या नाशिक दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भले मोठे खिंडार पाडल्यानंतर राज्याचे माजी पर्यटनमंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे संभाव्य डॅमेज कंट्रोलसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले अाहेत.

त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा येत्या गुरुवारी नाशिकमध्ये धडकणार आहे. या दौऱ्यात नाशिकची गढी शिंदे यांच्या बंडामुळे भुसभुशीत झाली आहे का याची चाचपणी आदित्य यांच्याकडून केली जाणार असून या दौऱ्यात अनुपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवरही नजर ठेवली जाणार आहे.

त्यातून शिंदे गटाकडे जाणाऱ्या संभाव्य चेहऱ्यांची पडताळणी होणार आहे.

शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे हे पायउतार झाले. त्यानंतर शिंदे यांनी सातत्याने सेनेला धक्के देणे सुरू केले असून ४० आमदारांपाठोपाठ १२ खासदारांचा गटदेखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. याबरोबरच सेनेमधील नेते, उपनेते अशा पदावरील महत्त्वाच्या व्यक्तींनीही शिंदेंसोबत जाण्यास सुरुवात केली आहे.

भविष्यात नेमके काय होईल हे सांगणे कठीण झाल्यामुळे आता ठाकरे यांनी कोणावरही अवलंबून न राहता संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी तळापर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे व २१ जुलैनंतर ते उर्वरित महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून मुंबईवरून नाशिकमध्ये ते येणार आहेत.

Loading