स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केल. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. मोदींनी आपल्या भाषणात कुठल्या मुद्द्यांना स्पर्श केला जाणून घेऊयात.
विकसित भारत, समृद्ध भारतयंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ही ‘विकसित भारत २०४७’ अशी आहे. या निमित्त १४० कोटी देशवासियांना पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे. यासाठी सरकारकडून मोठे कष्ट घेतले जात असल्याचं सांगताना जनतेकडून सूचना मागवल्याचं मोदींनी सांगितलं. यामध्ये लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून त्यावर काम सुरु असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
विविध क्षेत्रात सुधारणा: त्याचबरोबर विविध क्षेत्रात सुधारणा गरजेच्या असून जनतेनंही याबाबत आपलं मत व्यक्त केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. यासाठी शिक्षणात, शेतीमध्ये, उद्योगांमध्ये, कायद्यांमध्ये, राजकारणात तसेच अंतराळ संशोधन क्षेत्रात सुधारणा गरजेचं असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. यांपैकी अनेक क्षेत्रात सुधारणात केल्या जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.देशात आज सुमारे ३ लाख संस्था काम करत आहेत. या ३ लाख संस्थांना मी आवाहन करतो की, तुम्ही आपल्या स्तरावर सामान्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी यासाठी किमान २ सुधारणा घडवून आणाव्यात आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
मातृभाषेचा अधिकाधिक वापर: यावेळी पंतप्रधानांनी तरुणांना विविध क्षेत्रात मातृभाषेचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
मेडिकलच्या जागा वाढवणार: “वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुलं देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत, यासाठी त्यांचे लाखो करोडो रुपये खर्च होतात. सुमारे २५,००० तरुण प्रत्येक वर्षी मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं. कधी कधी अशा देशात जावं लागतं की मी विचार केला तर हैराण व्हायला होतं. त्यामुळं गेल्या १० वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या १ लाख केल्या. त्यामुळं आम्ही हे निश्चित केलं आहे की येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात ७५,००० नव्या जागा तयार केल्या जातील, अशी घोषणाही यावेळी मोदींनी केली.
डिझाईनिंग इंडियावर भर: भारत जगात आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू आणि सुविधांसाठी ओळखला जाईल. यासाठी आम्ही डिझाईनिंग इंडियावर भर द्यायचा आहे. त्यासाठी इंडियन स्टँडर्ड हे इंटरनॅशनल स्टँडर्ड बनावं हे आपलं लक्ष्य असावं. यासाठी डिझाईनिंग इंडिया आणि डिझाईनिंग फॉर वर्ल्डवर आपला फोकस असायला हवा. गेमिंगचं जग आज वेगानं विकसित होत आहे. आपण गेमिंगच्या जगात नवं टॅलेंट आणू शकतो. मला वाटतं की भारताची मुलं, भारतातील तरुणांनी आयटी, एआय प्रोफेशनल गेमिंगच्या जगात आपलं नाव करावं.
सेक्युलर नागरी कायदा: सुप्रीम कोर्टानं समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत वारंवार भाष्य केलं आहे. देशातील मोठ्या वर्गाला असं वाटतंय आणि ते खरंही आहे की आजचा देशातला जो नागरी कायदा आहे तो प्रत्यक्षात कम्युनल सिव्हिल कोड आहे. पण आता देशाला सेक्युलर सिव्हिल कोडची गरज आहे. त्यानंतर आपण मुक्त आणि धर्मावर आधारित भेदभाव संपवू शकतो, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
वन नेशन, वन इलेक्शन: मोदींनी आपल्या भाषणात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ संकल्पनेचा उल्लेख केला. “आज प्रत्येक काम निवडणुकीसाठी केलं जातं आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या विचार मांडले आहेत. यासाठी आपण एक कमिटी तयार केली आहे. देशाला ‘वन नेशन, वन इलेक्शन’चा स्विकार करावा लागेल यासाठी जनतेला पुढे यावं लागेल. मी राजकीय पक्षांना आग्रह करतो की, भारताच्या प्रगतीसाठी वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा द्यावा.
घराणेशाही संपवण्यासाठी नवं राजकारण: मोदी भाषणात म्हणाले, “घराणेशाही आणि जातिवादामुळे लोकशाहीला मोठा धोका आहे. यापासून देशाला मुक्त करणे ही आमची जबाबदारी आहे. यासाठी आमचं एक महत्त्वाकांक्षी मिशन आहे त्यानुसार एक लाख तरुणांना राजकारणात आणायचं आहे. ज्यांना कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा तरुणांना राजकारणात आणायचं आहे. यामुळं देशाला घराणेशाही आणि जातिवादातून मुक्ती मिळेल आणि नवी विचारधारा पुढे येईल, हे तरुण कोणत्याही पक्षात जाऊ शकतात” असंही मोदी यावेळी म्हणाले.