मुंबई (प्रतिनिधी): राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
नवाब मलिक यांना आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेलं आहे.
सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी ईडीचे अधिकारी करत होते.
त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असल्याची बातमी समोर आली आहे.
अटक केल्यावर कुठल्याही आरोपीला 24 तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करावे लागते आणि त्यापूर्वी मेडिकल टेस्ट (वैद्यकीय तपासणी) करावी लागते. या वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करावे लागते. ईडीने मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याने आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
नवाब मलिक हे सातत्याने भाजप नेत्यांवर आरोप आणि टिका सातत्याने करत होते. भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या नवाब मलिकांना अटक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा एक मोठा झटका बसला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता नवाब मलिकांना अटक झाली आहे.
नवाब मलिकांना अटक होताच मंत्री अस्लम शेख यांची प्रतिक्रिया आली आहे. अस्लम शेख यांनी म्हटलं, अशा प्रकारच्या कारवाईचं कुणीही समर्थन करणार नाही. रागाच्या भरात कारवाई करणं चुकीचं आहे. संपूर्ण महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्यासोबत आहे.
सकाळी पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक स्वत:हून ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू होती.
1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगाराची आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केला होता. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करत इकबाल कासकरची ईडीने चौकशी केली होती.
इकबाल कासकर याच्या चौकशीनंतर आता नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी बोलावलं होतं. या जमीन व्यवहारात नवाब मलिक यांचा काही संबंध आहे का? या व्यवहारांच्या संबंधीच मलिकांना चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी बोलावलं आहे का? या बाबत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये.