रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या नाशिकच्या तीन नर्ससह एका फार्मासिस्टला अटक !

नाशिक (प्रतिनिधी): रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पोलिसांनी गुरुवारी (दि.१३) रात्री ११ वाजेदरम्यान के. के. वाघ कॉलजेजवळ राज्यात पहिल्यांदाच तरुणींच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये तीन नर्स व एका फार्मासिस्टचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ हजारांचे दोन रेमडेसिवीर, मोबाईल, दुचाकी जप्त केली आहे.

जागृती शार्दुल (रा.अहिवंतवाडी, ता. दिंडोरी), स्नेहल पगारे (रा. शांतीनगर, मनमाड) आणि श्रृती रत्नाकर उबाळे (रा. विठ्ठलनगर, कोटंमगाव, ता. येवला) व कामेश रवींद्र बच्छाव (रा. उदय कॉलनी, तोरणानगर, सिडको) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी उपयुक्त असलेल्या रेमडेसिवीर मिळण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियोजन केले असले तरी आजही नाशिक शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचे पोलीस कारवाईवरुन समोर आले आहे.

जत्रा हॉटेलचौकाजवळ एका फ्लॅटमध्ये तिघी मैत्रिणी राहत आहेत. तिघीही शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरीस आहेत. तर संशयित कामेश बच्छाव दुसर्‍या खासगी हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून नोकरीला आहे. रेमीडिव्हीर घेऊन के. के. वाघ कॉलेजजवळ भेटण्याचे आणि ३ हजारांचे दोन रेमडेसिवीर ५४ हजार रुपयांमध्ये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे श्रृती उबाळे आणि जागृती शार्दुल रेमडेसिवीर विक्रीसाठी आल्या. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी रेमडेसिवीर विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. न्यायालयाने चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित तीन तरुणी व एका तरुणास वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने रेमडेसिवीरची मागणी व तुटवड्याची माहिती होती. त्यांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना हेरायचे आणि चढ्या भावाने रेमडेसिवीर विकायची कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी रुग्णालयातच रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु केला. ही बाब आडगाव पोलिसांना समजली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून चौघांना अटक केली. तरुणींनी रेमडेसिवीर कोणाकडून आणले. ते किती रुग्णांना विकले. याप्रकरणात आणखी कोण आहे, याचा तपास आडगाव पोलीस करत आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News