महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचीपूर्वपरीक्षा आता २१ मार्चला

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आता २१ मार्च रोजी होईल. १४ मार्च रोजी होणारी ही परीक्षा गुरुवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती. आयोगाने नव्या तारखेसंबंधी सुधारित परिपत्रक काढले आहे. यानुसार, एमपीएससीच्या अन्य नियोजित परीक्षा २७ मार्च आणि ११ एप्रिल रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ही परीक्षा नियोजित वेळेला म्हणजे १४ मार्चलाच घेण्यात यावी, अशी मागणी लावून धरत शुक्रवारीही धुळ्यासह राज्यात अनेक ठिकाणी विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली.

या परीक्षांच्या तारखांवरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका केली. हा विषय संवेदनशील असूनही आयोगाने तो तत्परतेने हाताळला नाही, असे पवार यांनी नमूद केले.
नव्या वेळापत्रकानुसार २१ मार्च रोजी राज्यातील विविध केंद्रांवर ही पूर्वपरीक्षा होत असून १४ मार्चच्या नियोजित परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांना हॉलतिकिटे मिळाली आहेत ते सर्व विद्यार्थी २१ मार्चच्या परीक्षेसाठी पात्र समजले जातील, असे आयोगाने शुक्रवारी स्पष्ट केले. गेल्या एप्रिलमध्ये ही पूर्वपरीक्षा व्हावयाची होती, पंरतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्यानंतरच्या काळात ही परीक्षा सातत्याने लांबणीवर पडत गेली.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News