‘महाराष्ट्रातच देऊळ बंद का?’ राज ठाकरेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना विचारला सवाल

मंदिरांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची कानउघडणी केली आहे.

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्रातही 2 सप्टेंबरपासून मिशन बिगींन अगेनला सुरुवात झाली आहे. अनलॉक 4.0मध्ये ठाकरे सरकारनं काही सवलती देत हॉटेल्स आणि मॉल खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अद्याप मंदिरांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून सरकारवर टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची कानउघडणी केली आहे.

राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहून “सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस हिंदू श्रद्धाळू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?”, असा सवाल विचारला. तसेच, ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असे खडेबोलही सरकारला सुनावले.

“कोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या” असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तर, मंदिरात काम करणाऱ्यांच्या रोजगाराबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. “मंदिरं सुरु करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो ह्यांचा सरकार विचार करणार आहे का नाही? मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे?”, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News